डॉ. जयंत मोरेश्वर चिपळूणकर

dr-jayant-chiplonkar

जन्मः २१ सप्टेंबर १९४९.
शिक्षणः एम एससी (प्राणिशास्त्र), पीएच डी (प्राणिशास्त्र) (पुणे विद्यापीठ).
नोकरीः

  • शिक्षक, फर्ग्यूसन महाविद्यालय, पुणे.
  • संशोधक
    • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे, (एन आय व्ही)
    • नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (एन सी सी एस)

 

एन आय व्ही मधे पेशीशास्त्र ह्या विषयात मी संशोधनास सुरवात केली. त्याच वेळेस प्राण्यांच्या पेशी कोशिकांवरील संशोघनांसंदर्भात एक नवीन योजना तयार केली जात होती. त्या कामात मी भाग घेतला होता. ती योजना मंजूर झाल्यावर पुण्यात नॅशनल टिशू कल्चर फॅसिलिटी (पुढे ह्याचे नाव नॅशनल फॅसिलिटी फॉर अॅनिमल टिशू अँड सेल कल्चर, आणि नंतर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स असे झाले) ही संस्था सुरू झाली. मी त्या संस्थेत लगेचच रुजू झालो. तिथे अगदी सुरवातीपासूच ही नवीन संस्था उभारण्यासाठी काम केले. ह्या कामांखेरीज माझे पेशींवरील संशोधनही पुढे नेता आले. त्यासाठी हिस्टोकेमिस्ट्री, डिजीटल इमेज अॅनॅलॅसिस, कॉनफोकल मायक्रोस्कोपी, अशा नव्या प्रकारांचा वापर केला. हे करताना पीएच डी साठी गाईड म्हणूनही काम केले.

२००४ मधे ह्या नोकरीतून मी ऐच्छिक निवृत्ती घेतली. त्यानंतर आळंदीतील जागृती अंध मुलींची शाळा इथे माझी ओळख झाली. तेव्हाच त्या शाळेसाठी आपण मदत करू शकू असे वाटले. त्यासाठी मी प्रथम ब्रेल लिपी शिकलो. त्या शाळेतील गरजेप्रमाणे वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांतील मजकूर ब्रेल लिपीत लिहून एंबॉस करून देऊ लागलो.

हे सारे करत असताना त्या शाळेतील अंध मुलींच्या अडचणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्या सोडविण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपण काय करू शकू असे विचार वारंवार मनात येऊ लागले. अंधांसाठी ब्रेल मजकूर एंबॉस करावा लागतो. तो छापता येत नाही. बराच प्रयत्न केल्यावर अशा प्रकारची छपाई करता येऊ शकेल असे वाटले. त्यासाठी छपाईचे अनेक प्रयत्न केल्यानंतर एक प्राथमिक प्रयोग करायचे ठरविले. त्यानुसार, मराठी ब्रेल लिपीत लिहिलेल्या शुभंकरोति दिनदर्शिका २००६-०७ ह्या पहिल्या दिनदर्शिकेची छपाई केली. त्यात काही रेखाचित्रेही छापली होती. ह्या दिनदर्शिकेला फारच छान अभिप्राय मिळाला. त्यामुळे दर वर्षी अशी दिनदर्शिका करायचे ठरविले. त्यात हव्या त्या सुधारणाही केल्या. प्रत्येक दिनदर्शिकेत पहिल्या काही पानांवर एखादा विषय निवडून त्यावर माहिती आणि रेखाचित्रेही समाविष्ट करत गेलो. दर वर्षी ह्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील अंधमुलांच्या शाळांकडे सप्रेम भेट देतो. अनेक शाळांमधून दिनदर्शिकेबद्दल छान प्रतिक्रिया मिळतात. ह्याशिवाय पाडवा-दिवाळीसाठी छापील शुभेच्छापत्रेही वाटली. पुढे टॅक्टाईल-ब्रेल पीरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स हे पहिले ब्रेल पुस्तक छापले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.


शुभंकरोति दिनदर्शिकेच्या पहिल्या आवृत्तीचे वितरण जागृती अंध मुलिंच्या शाळेत झाले (१५ ऑगस्ट २००६).

शुभंकरोति दिनदर्शिकेचे काम करत असतानाच ब्रेल पुस्तके छापण्याचाही विचार होताच. शाळेतल्या पाठ्यपुस्तकांखेरीज इतर अनेक विषयांवर पुस्तके लिहिता येतात. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांशिवाय इतरांनाही ही पुस्तके वाचता येतील. अशी पुस्तके टिकाऊ, छोट्या आकाराची, कमी पानांची, वाचायला सोपी आणि सुटसुटीत असावीत. ह्याखेरीज आधी कधीच चित्रे पाहिली नसतील तर आता अगदी साधी आणि सोपी रेखाचित्रेही प्रथमच स्पर्शाने बघता येतील. ह्या सर्व विचारांनंतर आता सचित्र राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय चिन्हे, प्रसिद्ध व्यक्ती, गोष्टी, विनोद, संगीत, अशा अनेक विषयांवर छोटी छोटी, सचित्र ब्रेल पुस्तके छापली आहेत.

 

पुरस्कार

 


ताल ह्या पुस्तकार तबल्यासाठी ब्रेल नोटेशन केल्याबद्दल बाल कल्याण संस्था, पुणे, यांच्यातर्फे सत्कार (डिसेंबर २००८).

 


टेक्निकल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, हडपसर येथे श्री प्रवीण दवणे यांच्या हस्ते ब्रेल छपाईबद्दल पुरस्कार (मे २०१५).